धुळ्यात तब्बल १६३ किलो अफूचा चुरा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई…
अफूच्या चुऱ्यासह बनावट देशी दारूचा साठा जप्त; एकूण २९ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत…
अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर धुळ्यात पोलिसांचा दणका…
धुळ्यात अंमली पदार्थ आणि बनावट दारूविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. मोहाडी उपनगरातील संजयभाऊ नगर परिसरात छापा टाकून पोलिसांनी तब्बल १६३ किलो ८३ ग्रॅम अफूचा चुरा जप्त केला आहे. तसेच बनावट देशी दारूचा साठा आणि दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मशीन व इतर साहित्यही पोलिसांनी हस्तगत केले आहे.
या कारवाईत पोलिसांनी एकूण २९ लाख ४१ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संशयित आरोपीविरोधात मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमली पदार्थांचा हा मोठा साठा नेमका कुठून आणण्यात आला होता आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अफूचा चुरा आणि बनावट दारूविरोधातील या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.


