Dhule News: धुळे जिल्ह्यात महामार्गावर ओम्नी व्हॅनला भीषण आग; तिघे प्रवासी थोडक्यात बचावले, 2 किमीपर्यंत वाहतूक ठप्प
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर-सामोड महामार्गावर एका ओम्नी व्हॅनला अचानक आग लागल्याने मोठा गोंधळ उडाला. ही घटना आज घडली असून सुदैवाने वाहनातील तिन्ही प्रवासी सुखरूप बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्हॅन पिंपळनेरहून सामोडमार्गे साक्रीकडे जात होती. दरम्यान, प्रवासादरम्यान अचानक वाहनातून धूर निघू लागला आणि काही क्षणातच व्हॅनने पेट घेतला. परिस्थितीची जाणीव होताच वाहनातील तिघांनी तातडीने बाहेर पडत जीव वाचवला.
प्राथमिक अंदाजानुसार, वाहनाच्या वायरिंगमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी. तसेच तीव्र उष्णता आणि दीर्घकाळ वाहन चालवणे हीदेखील संभाव्य कारणे मानली जात आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
बाईट:
“अचानक व्हॅनमधून धूर निघायला लागला आणि काही क्षणातच ती पेटली. आम्ही लगेच वाहन थांबवून बाहेर पडलो, त्यामुळे मोठा अनर्थ टळला,” अशी प्रतिक्रिया एका कार चालकाने दिली.

