Dhule Crime News: चिली स्प्रे मारून 1.20 लाखांची लूट, सोनगीर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे
धुळे जिल्ह्यातील रामी गावाजवळ ड्रायफ्रुट व्यापाऱ्याच्या डोळ्यात चिली स्प्रे मारून १ लाख २० हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा सोनगीर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मास्टरमाइंडसह सहा आरोपींची ओळख पटवली असून, त्यापैकी दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कापडणे येथील व्यापारी वासुदेव माळी हे ड्रायफ्रुटचा माल घेऊन जात असताना रामी गावाजवळ दोन मोटारसायकलवर आलेल्या चार जणांनी त्यांची ओमनी व्हॅन अडवली. आरोपींनी माळी यांच्या डोळ्यात चिली स्प्रे मारत लोखंडी रॉडने मारहाण केली आणि १ लाख २० हजार रुपयांची रोकड बळजबरीने लुटून घटनास्थळावरून पसार झाले.
या धाडसी लुटीची माहिती मिळताच सोनगीर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली.
या तपासात राहुल पुंडलीक पाटील (रा. बोरीस) आणि कट रचणारा निलेश सुनिल पाटील (रा. कापडणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर विठ्ठल भोळे, साई उर्फ भटू माळी, मनोज पाटील आणि जॅकी तनवाणी हे चार आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सोनगीर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचे कौतुक होत आहे.


